पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या इम्रान जानी शेख (वय-२६ वर्षे) अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
इम्रान जानी शेख (वय-२६ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ३०१, स्वामी बिल्डींग, कात्रज), असे गुन्हेगाराचे नाव आहे. नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, सुरा, पालघन यासारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्याविरूध्द ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे विनायक गायकवाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखेचे चंद्रकांत बेदरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली. स्थानबध्दतेची ही ७४ वी कारवाई आहे.
