राहुल मोटे यांचा इशारा : भूम – परांडा मतदार संघात राजकीय वाकयुद्ध सुरु
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : बाहेरून येऊन भूमीपुत्रांना धमक्या देऊ नका, शेवटी जनताच तुम्हाला योग्य ती जागा दाखवेल असा इशारा माजी आमदार राहुल मोटे यांनी मंत्री तानाजी सावंत यांना दिला आहे.
भूम येथील शासकीय विश्रामगृह येथे माजी आमदार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांच्या आरोपाला उत्तर देत त्यांच्यावर टीकेच्या फैरी झाडल्या. निवडणुका तोंडावर येत असल्याने आता आजी माजी आमदारांचे हे वाकयुद्ध सुरू झाले आहे.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत हे शहरात एस.टी.डेपोच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास आलेले होते त्यावेळी त्यांनी माजी आमदार राहुल मोटे यांनी पंधरा वर्षे मतदारसंघात विकास केला नाही अशी टीका केली होती. त्यावर उत्तर देताना मोटे यांनी गेल्या पंधरा वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. सीना कोळेगाव प्रकल्प सोडला तर या मतदारसंघात 500 कोटी रुपये सिंचनासाठी खर्च केलेला आहे आणि हे शंभर टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. त्यात त्यांनी प्रामुख्याने शिराळा उपसा सिंचन, सोनगिरी, इसरूप, लिंगी पिंपळगाव, आनाळा, पांढरेवाडी, येसवंडी, दुधाळवाडी, कडकनाथवाडी, हातोला स्टोरेज टॅंक, वांगी साठवण तलाव अशी सिंचनाची कामे पूर्ण केली. आपल्या कार्यकाळात शासकीय इमारती सेंट्रल बिल्डिंग भूम, भूम परंडा वाशी तहसील कार्यालय, कोर्ट वाशी, सामाजिक न्याय विकास वस्तीग्रह परांडा कोर्टाची इमारत, डी वाय एस पी ऑफीस, भूम तहसील कार्यालय, वैद्यकीय दवाखाना, आयटीआय इमारत, पूर्ण केलेले आहेत. मतदार संघात सिंचनाचे प्रकल्प उभे केल्याने त्यात शाश्वत पाणीसाठा जमा होतो. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे असे ते म्हणाले.
तानाजी सावंत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, इलेक्शन आल की तुमच्यासारखे लोक फक्त दिखावा करतात. त्याने विकास होत नाही. जर या मतदारसंघात मी काही केले नसते तर तानाजी सावंत यांनी माझ्या मतदारसंघात साखर कारखाना टाकलाच नसता. सिंचन क्षेत्रात वाढ असल्यामुळेच कारखाना टाकला हीच माझ्या कामाची पावती आहे.
तानाजी सावंत यांनी राहुल मोटे यांच्यावर टक्केवारीचे आरोप केले होते. त्यावर उत्तर देताना त्यांनी माझ्यावर केलेले आरोप हे मोघम आणि आधार नसलेले आहेत. मी जर टक्केवारी घेतली असती तर त्या पंधरा वर्षात कुठल्यातरी वर्तमानपत्रात त्याची बातमी आली असती. पण सध्या तानाजी सावंत यांच्याच भ्रष्टाचाराच्या बातम्या वर्तमानपत्रात व टीव्ही चॅनलवर येत आहेत. इतर कोणतेही मंत्री सोडून फक्त तानाजी सावंत यांच्या आरोग्य विभागाच्या बातम्या का येतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शांत स्वभावाचे समजले जाणारे राहुल मोटे आक्रमक होताना दिसले. यावेळी हनुमंत पाटोळे, रमेश मस्कार, रुपेश आप्पा शेंडगे, आबा मस्कर, संजय पाटील, प्रवीण खटळा, तात्यासाहेब गोरे,आर डी सुळ, बाळा नाईकवाडी, राजेंद्र गाढवे, सुग्रीव दराडे आदी यावेळी उपस्थित होते.
