सभेस येणाऱ्या नागरिकांना सकाळी ७-३० वाजेपासून येण्याचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : प्रधानमंत्री यांच्या सभेच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सभेस येणाऱ्या सर्व नागरिकांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे.
तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळावा, म्हणून सभेस येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशास सकाळी ०७-३० वाजेपासून सुरुवात करण्यात येणार आहे.
सभेस येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे सकाळी ०७-३० वाजेपासून येण्याबाबत जिल्हा पोलीस प्रशासतर्फे आवाहन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भारत सरकार यांचा शुक्रवारी, १९ जानेवारी रोजी सोलापूर ग्रामीण जिल्हा दौरा कार्यक्रम आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर मौजे कुंभारी येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १५ हजार घरकुलांचे लाभार्थ्यांना वितरण सार्वजनिक समारंभाद्वारे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सार्वजनिक सभेचं आयोजन करण्यात आलेले आहे. सुरक्षा कारणाने नागरिकांची सुरक्षा तपासणी वेळेमध्ये पूर्ण होणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या आगमनापूर्वी कमीत-कमी एक तास अगोदर सर्व नागरिकांनी स्थानापन्न होणे आवश्यक आहे.
सभेस येणाऱ्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी सभेस येताना मोठ्या बॅग, झेंडे, बॅनर, राजकीय पक्षाचे बॅनर, घोषवाक्य फलक, पाण्याच्या बॉटल, खाद्यपदार्थ, ज्वालाग्रही पदार्थ, जसे लायटर, काडीपेटी इत्यादी, तसेच बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा असे पदार्थ सोबत आणू नयेत.
सभेसाठी दिलेल्या वेळेत सभास्थळी यावे व वर उल्लेख केलेले निषिध्द पदार्थ आणू नयेत. तपासणी निर्धारित वेळेत व घाई गडबड न करता पूर्ण करता यावी, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनास नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केलं आहे.















