चंद्रकांत दळवी, माजी आयुक्त आणि चेअरमन, रयत शिक्षण संस्था
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : एच. व्ही. देसाई हॉस्पिटल हे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेल्या कर्माच्या आदर्शावर चालणारे उत्तम उदाहरण असून मानवसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचा कृतीशिल वस्तूपाठ एच. व्ही. देसाई हॉस्पिटलने घालून दिल्याचे कौतुकोद्गार माजी आयुक्त आणि रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी आज काढले.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन मूल्यांना सुसंगत असे कार्य महाराष्ट्र अथवा देश पातळीवर करणारी व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येणारा ‘कर्मवीर पुरस्कार’ यंदा एच. व्ही. देसाई हॉस्पिटलला चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी दळवी बोलत होते. रुपये एक लाख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्र विषयाचे तज्ज्ञ लेखक सुरेश ढमढरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह तसेच शिक्षण व सहकारी संस्थांचे संस्थापक शिरीष चिटणीस आणि नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे यांना प्रज्ञावंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे गुणवंत सभासद आणि त्यांच्या गुणवंत मुलांचे सत्कार देखील यावेळी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष जनसेवा फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा, आमदार चेतन तुपे, माजी महापौर वेशाली बनकर, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक प्रा. जे. पी. देसाई, पतसंस्थेचे चेअरमन एम. डी. शिंदे, शिवाजी पवार, श्याम काळे, प्राचार्य एस.बी. पाटील, आय.बी. गायकवाड, डॉ. दशरथ ढवाळ, मधुकर फुंदे आणि श्रीकांत कडूकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एच. व्ही.देसाई आय हॉस्पिटलच्या वतीने हॉस्पिटलचे चेअरमन आणि ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई, अध्यक्ष आणि ज्येष्ठ व्यावसायिक राजेश शहा, कार्यकारी संचालक परवेज बिलीमोरिया आणि उपाध्यक्ष सुधीर साबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी बोलताना चंद्रकांत दळवी म्हणाले की, एका अंध व्यक्तीने सुरू केलेले हे हॉस्पीटल केवळ दृष्टीच नव्हे, तर जीवनाला दृष्टीकोन प्राप्त करून देण्याचे कार्य करीत आहे. यावेळी बोलताना डॉ. विनोद शहा म्हणाले की, सहकाराशिवाय उध्दार नाही, हे खरे असले तरी संस्कारांशिवाय सहकार यशस्वी होत नाही, हे वास्तव आहे. यावेळी बोलताना हॉस्पिटलचे चेअरमन आणि ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई म्हणाले की, निरंजन पंड्या या पूर्ण अंधत्व असलेल्या तरुणाने २००३ मध्ये या हॉस्पिटलची स्थापना केली असून याबद्दल त्यांना २०११ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. या हॉस्पिटलतर्फे आजपर्यंत सुमारे मोतीबिंदूंच्या साडेसात लाख शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यापैकी मोतीबिंदूच्या साडेचार लाख शस्त्रक्रिया या मोफत करण्यात आल्या आहेत. तसेच याठिकाणी विविध प्रकारची धर्मदाय कार्ये नियमितपणे केली जातात. तसेच डोळ्याच्या विकारांसंबंधीचे संशोधन कार्य या संस्थेतर्फे केले जाते. डोळ्यासंबंधीचा वैद्यकीय डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचा अभ्यासक्रम या हॉस्पिटलच्या महाविद्यालयातर्फे राबविण्यात येतो.हॉस्पिटल तर्फे एस.एम.जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आणि कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत डोळे तपासणी करून देण्यात येईल, असे आश्वासन ही देसाई यांनी यावेळी दिले. यावेळी एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलला देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. शर्वरी शुक्ला यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक प्रा. जे. पी. देसाई यांनी केले तर सूत्रसंचालन सुजाता टोके यांनी केले. कन्हैयालाल पालेशा यांनी आभार मानले.
