नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची ग्वाही
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देतानाच रस्त्यावरील गुन्हे कमी करण्याला पायबंद घालण्यात येईल, अशी ग्वाही नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली.
मावळते पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्याकडून नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मावळते पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे सहसंचालक म्हणून बदली झाली. तर नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे जळगाव येथून पदोन्नतीने सोलापुरात रुजू झाले आहेत. पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे मूळचे चेन्नई तमिळनाडू येथील आहेत. ते २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत मुंबई, नागपूर येथे पोलीस उपायुक्त, यवतमाळ, जळगाव येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर पदोन्नतीवर त्यांची पोलीस आयुक्त म्हणून सोलापुरात बदली झाली आहे.एम. राजकुमार म्हणाले, रात्र असो दिवस महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांच्या मनात घराबाहेर पडल्यावर कोणतीच आणि कोणाविषयी भीती असता कामा नये. चेन स्नॅचिंग, पाकीटमार तसेच रस्त्यावर अडवून होणारा कोणताही गुन्हा माफ केला जाणार नाही. ते करणारे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही. गुन्हे उघडकीस आणण्यावर आपला भर राहणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या जातील. टीमवर्कने केलेले काम हे उत्तम आणि उत्कृष्ट होते. उत्कृष्ट कामाची नक्कीच दखल घेतली जाईल, असेही आयुक्त एम. राजकुमार म्हणाले. सर्वसामान्य जनतेची सुरक्षा हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापुढे काम होईल. उत्सवप्रिय शहर म्हणून ओळख असलेल्या शहरात उत्सव आणि सण हे नागरिकांशी संवाद साधून साजरे करण्याकडे आपला कल असेल असेही त्यांनी डीजे आणि डिजिटल या विषयावर बोलताना सांगितले.
