खडक पोलिसांनी गुन्हेगारास केले जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : दुचाकीच्या डिक्की मधुन तब्बल ११,५०,००० रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे. खडक पोलीसांनी ही कामगिरी केली आहे.
रामकेवल सरोज, (वय-४६ वर्षे, सध्या रा- ज्ञानदा सोसायटी शिक्रापुर रोड चाकण पुणे, मुळ रा. १७२ पौथीपुर, कधईपुर, सुलतानपुर, लंभुआ, राज्य- उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी यांनी टिंबर मार्केट भवानी पेठ, येथे इमारतीच्या पार्कीगमध्ये पार्क केलेले गाडीच्या डिकीतील रोख ११,५०,००० रुपये त्यांच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीच्या इरादयाने चोरुन नेले.
या अज्ञात चोरटया विरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. टिंबर मार्केटसारख्या व्यापारी क्षेत्रामध्ये भर दिवसा ११,५०,००० रुपये चोरी केल्याचा प्रकार घडल्याने त्याचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरिक्षक, खडक पोलीस स्टेशन रविंद्र गायकवाड, पोलीस निरिक्षक (गुन्हे) संपतराव राउते, यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार यांना तपासाबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकातील अंमलदार यांची दोन पथके तयार करुन तात्काळ तपास सुरु केला.
तपास पथकातील एका पथकाने चोरीची घटना घडल्यानंतरचा मार्ग व एका पथकाने चोरीच्या घटनास्थळी येण्याचा मार्ग असे दोन्ही मार्गाचे सी.सी.टि.व्ही.फुटेज पाहण्यास सुरुवात केली. फुटेज तपासल्यानंतर फुटेजच्या आधारे पाहीजे आरोपीचा माग घेत असताना पाहीजे आरोपी हा बोपखेल फाटा येथे थांबला असल्याबाबत माहीती मिळाली. त्यानुसार बोपखेल फाटा याठिकाणी वरील वर्णनाचा व्यक्ती संशयितरित्या वावरताना सापडला. त्याला ताब्यात घेण्यात आले. व त्याचे नाव, पत्ता विचारताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्याला ताब्यात घेऊन दाखल गुन्हयात अटक करण्यात आले आहे. अटक आरोपीकडे गुन्हयात चोरी केलेल्या ११,५०,००० रुपये रोख रकमेबाबत चौकशी केली असता त्याने रोख रक्कम बँकेत पत्नीच्या खात्यावर जमा केल्याबाबत सांगितले. संबंधित बँकांना पत्रव्यवहार करुन वरील बँकेची खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच अटक आरोपीने चोरी करताना वापरलेल्या वाहनाबाबत तपास केला असता चोरी करताना वापरलेले होंडा शाइन ही मोटारसायकल राजगड पोलीस स्टेशन येथे चोरीस गेलेले वाहन असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.
ती मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. या गुन्हाच्या तपासाकरीता नेमलेल्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी जवळजवळ ५०० पेक्षा अधिक सी.सी.टि.व्ही. चिकाटीने तपासुन चोरटयाचा माग काढुन आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. त्याच्यावर पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मुंबई आयुक्तालयात एकुण चोरीचे ३० गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास राकेश जाधव सहायक पोलीस निरिक्षक, हे करीत आहेत ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे प्रविण पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ संदिपसिंह गिल, व सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग रक्मीणी गलांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदिप तळेकर, किरण ठवरे, हर्षल दुडम, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, सागर कुडले, लखन ढावरे, प्रशांत बड़दे, रफिक नदाफ, आशिष चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
