कार्बन फुटप्रिंट वापरून केलेले देशातील पहिले शासकीय संकेतस्थळ
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाच्या हायटेक आणि इको फ्रेंडली संकेतस्थळाचे लोकार्पण २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
हे संकेतस्थळ सायबर सुरक्षेच्या आणि तंत्रज्ञानाच्या कारणास्तव अद्ययावत करण्यात आलेले असून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.
हे नूतनीकरण करण्यात आलेले संकेतस्थळ हे कार्बन फुटप्रिंटचा विचार करून बनविण्यात आलेले भारतातील प्रथम शासकीय संकेतस्थळ आहे. जगभरातील ७२% वेब पेजेस पेक्षा कमी कार्बन उत्सर्जित करते.
त्याचे मानांकन प्राप्त झालेले असून नूतनीकरण केलेले संकेतस्थळ अतिशय फास्ट, सुरक्षित आणि नागरिकांना वापरण्यास सोपे आहे.
तसेच त्यामध्ये सायबर सुरक्षेवर विशेष भर देण्यात आलेले असून सहज हाताळण्यायोग्य बनविण्यात आलेले आहे.
नूतनीकरण करण्यात आलेले संकेतस्थळ हे मोबाईल, टॅबलेट, आयपॅड, लॅपटॉप आणि सर्व प्रकारच्या डेस्कटॉप वर सहजपणे आणि अतिशय चांगल्या प्रकारे पाहता येते. संकेतस्थळ मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असून अंध व्यक्तींना सुद्धा सहजपणे वापरता येते.
या संकेतस्थळावर भरतीविषयक माहीती, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे विविध उपक्रम, प्रसिद्धी पत्रक, निविदा आणि माहितीचा अधिकार इत्यादी माहिती अद्ययावत करण्यात आली आहे.
नव्या संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे वरिष्ठ अधिकारी आणि सर्व गट यांचे वरिष्ठ अधिकारी यांची माहिती, संपर्क क्रमांक आणि सर्व गटांची संपूर्ण माहिती तात्काळ उपलब्ध होऊ शकणार आहे.
अप्पर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य मुंबई चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल, परिक्षेत्र अशोक मोराळे आणि पोलीस उप महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य अभिषेक त्रिमुखे, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट २ नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार या संकेतस्थळाची निर्मिती हिंजवडी येथील ड्रीमकेअर डेव्हलपर्स या आयटी कंपनी कडून करण्यात आलेली आहे.
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने आणि सर्व नागरिक मोबाईल व इंटरनेचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने त्यांना त्याद्वारे राज्य राखीव पोलीस बलाच्या अधिकृत संकेतस्थळावर आवश्यक अशी सर्व माहिती उपलब्ध करून देण्याकरिता सदर वेबसाईट निश्चितच उपयोगी ठरणार आहे. संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन अप्पर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य चिरंजीव प्रसाद यांनी केले आहे.
