पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा उपक्रम : पालकांकडून उपक्रमाचे स्वागत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : भूम शहरात सध्या पोलीस प्रशासनाने प्रेमी युगलांवर करडी नजर ठेवली आहे. त्यासाठी पिंक पथक स्थापन करण्यात आले आहे.
भूम शहरात सुरू असलेल्या महाविद्यालय, शाळे समोरच्या सीसीटीव्ही कॅमेरा बघून अशा युगलांना पकडण्याचा धडाका सुरू केला आहे. प्रेमी युगल हे पोलिसांच्या समोर गयावया करताना दिसत आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रेमी युगलांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कॉलेजमधील तरुण – तरुणी या शिक्षणाच्या नावावर शहरात येतात, पण कॉलेजमध्ये न जाता भलत्याच ठिकाणी आपल्या प्रेमी बरोबर फिरताना दिसतात.
अशा प्रेमीयुगलावर भूम येथील DYSP ऑफिस मधील पिंक पथक हे करडी नजर ठेवून कारवाई करत आहे. भूम शहरात असणाऱ्या आलम प्रभू देवस्थान तसेच शहरातील इतर ठिकाणी प्रेमी युगल दिसल्यास तात्काळ त्यांची चौकशी केली जाते व त्यांच्या आई-वडिलांना याबाबत सूचना दिली जात आहे.
त्यामुळे प्रेमीयुगलांवर सध्या संक्रात आलेली असून कितीही लपून जाण्याचा प्रयत्न केला तरी तिसऱ्या डोळ्यामुळे ते पिंक पथकाच्या तावडीत अलगद सापडत आहेत.
आतापर्यंत या पिंक पथकाने दहा ते बारा प्रेमियुगलांना पकडले असून त्यांचे समोपदेशन करून सोडून देण्यात आलेले आहे. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी गौरीप्रसाद हिरमेठ यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकात पीएसआय भागवत गाडे, महिला पोलीस नाईक प्रतिभा मते व पोलीस कॉन्स्टेबल राम नागटिळक हे कार्यरत आहेत. या कारवाईचे भूम तालुक्यातील पालकांनी कौतुक केले आहे.
