महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : कमिन्स कंपनीची बनावट सही व शिक्के असलेली ऑर्डर तयार करून ती कंपनीला मिळाली असल्याचे सांगुन कंपनीकडुन वेळोवेळी 40 लाख रुपये घेऊन फिर्यादीच्या कंपनीस ऑर्डर न देता आर्थिक फसवणूक करुन पोबारा करणाऱ्या आरोपीला वारजे पोलिसांनी जेरबंद केले आहे.
गणेश पवार (वय ४० वर्षे, रा. भिगवण रोड, बारामती पुणे) असे आरोपीचे नाव आहे. मार्च २०२२ ते डिसेंबर २०२३ रोजी वारजे पुणे या ठिकाणी दामोदर पवार, व त्यांचा मुलगा गणेश पवार, दोन्ही (रा. भिगवण रोड, बारामती) या दोघांनी मिळून संगनमताने सुरुवातीला एक नग मिनी कॉम्पॅक्टर मशीन कंपनी कडून घेतली. फिर्यादी यांचा व त्यांच्या कंपनीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या कंपनीस कमिन्स इंडीया लिमीटेड या कंपनीने एकुण २५ नग मशिन, एकुण किंमत रुपये ८,२८,४१,९०० रुपयाची कमिन्स इंडीया लिमीटेड कंपनीची ऑर्डर मिळाल्याचे भासविले.
या कमिन्स कंपनीची बनावट सही व बनावट शिक्के असलेली बनावट ऑर्डर तयार करून ती त्यांच्या कंपनीला मिळाली असल्याचे सांगुन ती व्हॉटसपद्वारे पाठविली. त्या नंतर ती ऑर्डर फिर्यादीच्या कंपनीस देणार आहे असे आश्वासन दिले.
त्या बदल्यात फिर्यादीच्या कंपनीकडुन वेळोवेळी पैसे घेऊन फिर्यादीच्या कंपनीस ऑर्डर न देता ३९,८३,५०० रुपये रकमेचा घोटाळा केला. फिर्यादी व कंपनीची आर्थिक फसवणुक केली. म्हणून वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्हयातील पाहिजे आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवून कलबुर्गी, कर्नाटक या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली. आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांच्या परवानागीने कलबुर्गी, कर्नाटक राज्य येथे वारजे माळवाडी पोलीसांनी जाऊन शोध घेतला असता आरोपी हा मिळून आला.
त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास रणजीत मोहिते हे करत आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग भीमराव टेळे, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.



















