आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टोळी प्रमुख शुभम गायकवाड व त्याच्या ७ साथीदारांवर मोक्का

Spread the love

वानवडी पोलीसांची कारवाई

पुणे : टोळीप्रमुख शुभम गायकवाड व त्याच्या ७ साथीदाराविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. वानवडी पोलिसांनी ही कारवाई केली.

करण शिंदे (वय १९ वर्षे, रा. अंधशाळेचे पाठीमागे रामटेकडी हडपसर), मुज्जमिल शेख (वय १८ वर्षे रा. आनंदनगर रामटेकडी हडपसर), ओम भैनवाल (वय १८ वर्षे, म्हाडा बिल्डींग रामटेकडी हडपसर) यांना दाखल गुन्हयाचे अनुषंगाने अटक करण्यात आली आहे.

शुभम गायकवाड (वय २४ वर्षे, रा. आनंदनगर रामटेकडी हडपसर), विशाल जाधव (रा. अंधशाळेचे पाठीमागे रामटेकडी हडपसर) हे आरोपी आहेत. तसेच तीन विधिसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी हे एक नांमकित कंपनीत पार्टटाईम डिलेव्हिरी बॉय म्हणुन काम करतात. मोबाईलवर आलेल्या ऑर्डरप्रमाणे एका ग्राहकाची ऑर्डर देण्यासाठी ते दुचाकी गाडीवरुन रामटेकडी येथे गेले.

गाडी पार्क करुन ग्राहकाच्या सांगण्याप्रमाणे डॉ. डब्ल्यु.आर. खान ऊर्दू शाळेच्या मागील गल्लीत सार्वजनिक शौचालयाजवळ आण्णाभाऊ साठे वाचनालय रामटेकडी हडपसर येथुन ग्राहकांना त्याच्याघरी ऑर्डर देण्यासाठी जात होते.

तेंव्हा अंधारात तीन ते चार व्यक्तीनी अचानकपणे आडवे येऊन फिर्यादी यांना शिवीगाळ केली. जबरदस्तीने सॅक चेक करुन सॅक मधील हार्ड डिस्क, चेक बुक, २००० रुपये रोख रक्कम धारदार हत्याराचा धाक दाखवुन फिर्यादी यांच्याकडुन जबरदस्तीने हिसकावुन घेऊन पळुन गेले.

म्हणुन फिर्यादी यांनी तीन ते चार अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. दाखल गुन्ह्यातील शुभम गायकवाड याने वेळोवेळी त्याचे साथीदार बदलुन त्यामध्ये विधिसंघर्षित बालक यांचाही समावेश केला. त्याने संघटीतपणे मालाविरुध्दचे व शरिराविरुध्दचे गुन्हे केलेले आहेत.

त्यामध्ये त्यांनी संगणमत करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमविणे, इतरांचे जीवित व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणे, प्राणघातक हत्यारासह सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात सामील होणे, बेकायदेशीर गृह-अतिक्रमण करून विस्तव किंवा स्फोटक पदार्थाने नुकसान करणे, दरोडा टाकणे इ. प्रकारचे गुन्हे केले.

त्या भागातील लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल असे कृत्ये करून स्वतःचे अस्तीत्व लपविण्यासाठी वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा पेहराव करून अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याची एक प्रकारची त्याला सवयचं लागून गेलेली आहे.

टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांनी स्वतःचे व टोळीचे गैरवाजवी, आर्थिक व इतर फायदा मिळविण्याकरीता गुन्हे केलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग गणेश इंगळे हे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रविण पवार,अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील,पोलीस उपआयुक्त, परि- ५. आर. राजा त्यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतगे सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मनोज साळुंखे, अमोल कदम, उत्रेश्वर धस, महिला पोलीस अंमलदार चैत्राली यादव यांनी केलेली आहे. मोक्का अंतर्गत केलेली ही १४ वी कारवाई आहे.