महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : ०८ मार्च २०२४ रोजी गुरूवारी अर्हम फाउंडेशनच्या वतीने अर्हम कला व वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती नंदा पाराजे, स्वारगेट विभाग, प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या, तर व्यासपीठावर संस्थेच्या मान्यवर सदस्य सौ. राजश्री श्रीकांत पगारिया, सौ. प्रीती शैलेश पगारिया व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश भोसले उपस्थित होते.
यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील महिला सफाई कर्मचारी व पेट्रोल पंपावरील महिला कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी हजर होते.
यावेळी उपस्थित महिला सफाई कर्मचारी जयश्री जिनवाल, कुसुम रोकडे, आरिफा पठाण, सुनीता शिर्के, विमल साळवे, पुनम पाटोळे आणि रंजिता जेधे यांचा मान्यवरांच्या हस्ते साडी चोळी व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचाही गुलाबपुष्प व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रमुख पाहुण्या एसीपी पाराजे मॅडम यांनी स्त्रियांचे समाजातील बदलते स्थान व भूमिका, महिलांचे अधिकार आणि कायदे यावर प्रकाश टाकला. कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता व होणारे शोषण रोखण्यासाठीचे उपाय याबद्दलही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला सफाई कर्मचारी श्रीमती कुसुम रोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सफाई कर्मचाऱ्यांना समाजात आदराची वागणूक मिळत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य भोसले सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयातील शिक्षक प्रा. इंद्रजित केंद्रे यांनी केले तर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. प्रसाद तिकोने यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा शेवट सर्व उपस्थितांना अल्पोपहार देऊन करण्यात आला.
