स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : संचयनी सेव्हींग्ज इन्व्हेस्टमेंटस इंडीया च्या खातेदारांची फसवणुक करणारा व २६ वर्षापासुन फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी ही कामगिरी केली आहे.
या प्रकरणी विठ्ठठल गुरव (वय-52 वर्षे मूळ रा. उळेगांव द. सोलापूर सध्या राहणार थेरगांव, पिंपरीचिंचवड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. १५ मार्च पासून देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी आचारसंहितेच्या काळात सोलापूर ग्रामीण जिल्हयातील फरारी आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याबाबत पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सुचना दिल्या होत्या. या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या पथकास सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यास फरारी आरोपी यांची यादी तयार करून त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांचे पथक फरारी आरोपी याचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस हवालदार विजयकुमार भरले यांना माहिती मिळाली की, या गुन्हयातील फरारी आरोपी विठ्ठठल गुरव (वय-52 वर्षे मुळ रा. उळेगांव द. सोलापूर सध्या राहणार थेरगांव, पिंपरीचिंचवड) हा थेरगाव बस स्टॅन्ड पिपरी चिंचवड येथे येणार आहे.
त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे. आरोपी हा संचयनी सेव्हींग्ज इन्व्हेस्टमेंटस इंडीया या कंपनीत कर्मचारी म्हणून काम करीत असताना, त्याने एकुण 1993 ते 1997 या कालावधीत खातेदाराकडुन मासिक हप्त्याची रक्कम वेळो वेळी वसुल करुन ती रक्कम खातेदारांच्या नावावर न भरता स्वताच्या फायदयासाठी वापरुन अपहार केला.
म्हणून त्याच्यावर 8 ऑक्टोबर 1997 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपी हा मुंबई, बेंगलोर, कोल्हापुर, पुणे वगैरे भागात लपून राहत होता. या आरोपीस पुढील कार्यवाहीकरिता सोलापूर तालुका पोलीस ठाणे याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार महमद मुजावार, परशुराम शिंदे, सलीम बागवान, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, विनायक घोरपडे, सतीश कापरे यांनी बजावली आहे.
