आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीच्या मृत्यूचे गूढ उलगडले, एकाला अटक

Spread the love

पुणे : हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीच्या मृत्यूचे गूढ उलगडले असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वसतिगृह चालक सुनील परमेश्वर महानोर याला अटक केली आहे.

अभिलाषा मित्तल ही विद्यार्थिनी पुण्यात गुरुवार पेठेतील वसतिगृहात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राहत होती. तिने आत्महत्या केल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. परंतु अभिलाषाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याने संशय निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला असून खडक पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वसतीगृह चालकावर ठपका ठेवला आहे.

अभिलाषा ही मूळची वाशिम जिल्ह्यातील होती. गेल्या महिन्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती. खोलीमध्ये एकटी असताना तिने आतून दरवाजा बंद करुन गळफास घेतला होता. खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा ज्या हॉस्टेलमध्ये राहत होती तेथील वसतिगृह चालक सुनील परमेश्वर महानोर याने तिला अमानत रक्कम मागितली तसेच मारहाण केली.

याबाबतची तक्रार तिच्या वडिलांनी खडक पोलिसांकडे दिली. त्यानुसार सुनील महानोर याला अटक केली आहे. सुनील महानोर याने तिला मारहाण केल्यानंतर ती रडत खोलीमध्ये गेली होती. त्यानंतर तिने खोलीच्या दरवाजा लावून घेतला होता.

अभिलाषा हिने तिचे वडील महेंद्र मित्तल यांना हॉस्टेल बदलायचे असल्याचे फोनवर सांगितले होते. परंतु ती जीवन संपवेल, असा विचार कोणाच्या मनात आला नाही. याप्रकरणी महेंद्र मित्तल यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.