महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुणे शहरात सायबर क्राईम मात्र वेगाने वाढताना दिसतो आहे. एकाच दिवशी पुणे शहरात सायबर क्राईमचे ११ फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. सध्या ऑनलाईन व्यवहार वाढले असल्याने त्याचाच फायदा घेऊन सायबर चोरट्यांकडून फसवणुक होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
लोन अॅप, टास्क फ्रॉड, विज बील भरण्याच्या बहाण्याने फसवणूक, शेअर मार्केट अशा अनेक फसवणुकीच्या घटनांमध्ये पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी एकाच दिवशी शहराच्या विविध पोलीस ठाण्यात 11 गुन्ह्याची नोंद झाली आहे.
गॅसचे बिल भरण्याच्या बहाण्याने 82 वर्षीय व्यक्तीची 7 लाख 67 हजार 620 रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. यू ट्युबवरील व्हिडीओला लाईक करण्यास सांगून 40 वर्षाच्या महिलेची 2 लाख 90 हजारांची फसवणूक झाल्याचाही गुन्हा कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.
विजबिल थकीत असल्याचे सांगून 59 वर्षीय व्यक्तीची 11 लाख 6 हजार 195 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दाखल केलेला आहे. शेअर मार्केटमधून नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने 54 वर्षीय महिलेची 15 लाख 13 हजार 051 रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.
पार्ट टाईम नोकरीच्या बहाण्याने 27 वर्षीय महिलेची 3 लाख 71 हजार 750 रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. तसेच टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करुन 44 वर्षीय महिलेची 27 लाख 88 हजार 323 रुपयांची फसवणूक केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यानंतर जास्त परताव्याचे आमिष दाखवून 36 वर्षीय युवकाची 5 लाख 2 हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा वानवडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. तशाच प्रकारचा ऑनलाईन टास्क देऊन 44 वर्षीय महिलेची 1 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे.
तसेच शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करण्यास सांगून 24 वर्षीय तरुणाची 2 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करण्यास सांगून 36 वर्षीय युवकाची 2 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचेही गुन्हे इथेच दाखल आहेत. वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने 44 वर्षीय महिलेची 4 लाख 72 हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
