महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहराबाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल १७ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीपर्यंत राहणार आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
पंढरपूरात यात्रे निमित्त नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, (अहिल्यादेवी चौक) शेटफळ चौक मार्ग विसावा येथे पार्क करावीत. ६५ एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्क करावीत. पुणे, सातारा, वाखरीमार्गे येणारी वाहने इसबावी विसावा येथे पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत.
कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येऊन वेअर हाऊस येथे पार्क करावीत. तसेच विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने टाकळी बायपासमार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदीर येथे पार्क करावीत. पंढरपूर शहरातून टेंभुर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणाऱ्या सर्व वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, करकंब चौक मार्गे जातील. पुणे- साताऱ्याकडे जाणारी वाहने सरगम चौक, कॉलेज क्रॉस रोड वाखरी मार्गे जातील तर विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढा मार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका येथून टाकळी बायपास व गादेगाव फाटा मार्गे जातील.
१७ ते २० एप्रिल २०२४ पर्यंत प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार चौक ते शिवाजी चौक, सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. बार्शी, सोलापूर मार्गावरुन येणारी तीन रस्तामार्गे येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पटांगणात उतरतील. नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एस.टी. बसेसना जुना दगडी पुल, नवीन पुल व तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
त्याचबरोबर मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक, लहुजी वस्ताद चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक, शिवाजी चौक ते अर्बन बँक, संकुल कार्नर ते नगरपालिका भक्ती मार्ग ते काळा मारुती चौक हा मार्ग पासेसच्या वाहना व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनासांठी बंद ठेवण्यात येणार आहे.
कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी मार्गे येऊन वेअर हाउस येथे पार्क करावीत. विजापूर, मंगळवेढाकडून येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाऊस येथे पार्कींग करावीत.
यात्रा कालावधीत शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण, गजानन महाराज मठ, नगरपालिका पार्कींग, क्रीडा संकुल तसेच संबधीत मठामध्ये पार्क होतील शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क करण्यास मनाई असेल.
कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक ते सावरकर चौक ते नवीन कराड नाका यामार्गावर एकेरी वाहतुक राहील. संबधित भाविकांनी व वाहनधारकांनी या बदलेल्या वाहतूक मार्गाची नोंद घेऊन वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सरदेशपांडे यांनी केले आहे.
