इंद्रायणी पाटील, प्रभाकर भोसले, प्रतिभा चंद्रन हेदेखील मानकरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आचार्य कै. डाॅ. माधव पोतदार यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने देण्यात येणारे २०२४ सालचे ‘उत्कृष्ट कर्तृत्व गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या संगीता बर्वे, शिक्षण क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल डाॅ. अ. ल. देशमुख, शाहीरी परंपरेतील योगदानासाठी इंद्रायणी पाटील, कला क्षेत्रासाठी प्रभाकर भोसले आणि पत्रकारितेतील योगदानासाठी प्रतिभा चंद्रन यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
पुरस्कार प्रदान सोहळा येत्या मंगळवारी दिनांक १६ एप्रिल रोजी भारतीय विचार साधना सभागृह येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. ज्येष्ठ संपादक व विचारवंत विजय कुवळेकर आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते या पुरस्कारविजेत्या मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती ‘शब्दसारथी’चे संचालक पराग पोतदार यांनी दिली.
‘शब्दसारथी’च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य डाॅ. माधव पोतदार यांचे ज्या ज्या क्षेत्रात काम आणि योगदान होते त्या क्षेत्रात उत्तम काम केलेल्या एका व्यक्तीचा सन्मान करून ते कार्य अधिक पुढे जात राहावे या उद्देशाने हे कर्तृत्व गौरव पुरस्कार सुरू करण्यात आलेले आहेत.
डाॅ. पोतदार यांनी आपल्या हयातीत प्रकाशित-अप्रकाशित अशा १८३ पुस्तकांचे लेखन केले होते. शाहिरी परंपरा या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास होता व त्या विषयावर त्यांचे ग्रंथही प्रकाशित आहेत. आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकात बातमीदार म्हणून डाॅ. पोतदार यांनी पत्रकारिता केलेली होती.
रायगड बहिःशाल केंद्राच्या माध्यमातून त्यांनी रायगड जिल्ह्यातील कोळी, कातकरी, आगरी समाजातील दोन हजार महिलांना पदवीधर करण्याचे मोठे काम केले होते. तसेच ते उत्तम चित्रकार आणि रंगावलीकारही होते.
अशा बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या स्मृती जागवताना त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करावा असा उद्देश ठेवून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती पराग पोतदार यांनी दिली.
