महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : बेकायदेशीर देशी बनावटीचे ६ पिस्टल व ३५ जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले. एकूण ४ आरोपींना जेरबंद करुन ३,०७,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणने केली.
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सर्व प्रभारी पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील अवैध धंदयावर तसेच अवैध अग्निशस्त्राबाबत विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत आदेश केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांचे पथक यांना माहिती मिळाली की सोलापुर पुणे महामार्गावरील टेंभुर्णी येथील एका हॉटेलच्या परिसरात दोन व्यक्ती देशी बनावटीचे गावठी पिस्टल बाळगून आहेत. त्या माहितीप्रमाणे सापळा लावून पकडले.
त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या व्यक्तींकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्यांनी सांगितले की, आम्ही दोघे व आमचा अजून एक मित्र असे आम्ही तिघे मागील काही दिवसापूर्वी ऊस टोळी कामगार आणण्याकरीता धुळे जिल्हयात गेलो.
तेथे आम्हांस मध्यप्रदेश सीमेवरील उमटी गांवात देशी बनावटीचे पिस्टल व राऊन्ड विकत मिळत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यासाठी आम्ही तेथे जाऊन ६ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व ३५ जिवंत राऊन्ड लोकांना विक्री करण्याकरिता घेऊन आलो.
त्यावरुन त्यांच्या तिसऱ्या साथीदारास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून ३ पिस्टल व १९ जिवंत राउन्ड हस्तगत केले. तसेच त्या तिघांनी विक्री केलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेवून त्याच्या कब्जातून १ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व ७ जिवंत राऊन्ड हस्तगत करण्यात आले.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके हे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधिक्षक, शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे यांनी बजावली आहे.
