आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हजारो दीप प्रज्वलीत करून भगवान महावीरांच्या चरणी व्यक्त केली कृतज्ञता !

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : नवकार मंत्रावरील नेत्रसुखद नृत्याविष्कार, नृत्यातून उलगडलेला भगवान महावीरांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आणि हजारो दीप प्रज्वलीत करून भगवान महावीरांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता अशा भक्तीमय वातावरणात श्री तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला.

श्री जैन सामुदायिक उत्सव समितीतर्फे जैन समाजाचे चारही संप्रदाय श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री दिगंबर जैन समाजाच्या संयुक्त विद्यमाने श्री तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते दीपप्रज्लवन करण्यात आले. यावेळी दिना धारिवाल, आदित्य धारिवाल, शैलेश लोढा, जैन सामुदायिक उत्सव समितीचे अध्यक्ष अचल जैन, विजयकांत कोठारी, विजय भंडारी, महावीर कटारिया, संपत जैन, अनिल गेलडा, सतीश शहा, हरीश शहा, गौतम छाजेड, पोपटलाल ओस्तवाल, राजेश सांकला, प्रकाश धोका, इंदर जैन, इंदर छाजेड, देविचंद जैन, जयंतीलाल जैन, दिलीप मेहता, अल्पेश गोगरी, अजय मेहता, व अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अहिंसा मरुधर जैन युवक मंडल यांनी केले.

यावेळी बोलताना लोढा म्हणाले की, आपल्या अधिकारांबरोबरच आपल्या कर्तव्यांविषयी आपण जागरूक राहणे आवश्यक आहे. स्वतंत्र भारताचे नागरिक या नात्याने आपल्याला आखून दिलेली कर्तव्ये आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. मानवता हाच खरा धर्म असून त्याच्यापेक्षा कोणताच धर्म मोठा नाही.

गरिब आणि श्रीमंत यांच्यातील विषमता बघून जो विचलीत होत नाही, ज्याच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत तो मनुष्य योनीत मोडतच नाही. आपण आपली मानसिकता सकारात्मक ठेवत आनंदी जीवन जगले पाहिजे. यासाठी कोणतीही धनसंपत्ती आणि सुविधा यांची आवश्यकता नसून आनंदी राहणे हे केवळ आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे.

नवकार मंत्रावरील नृत्याविष्काराने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. रंजू ओस्वाल यांनी दिग्दर्शित केलेल्या गरबा नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. भगवान महावीर यांचा जीवन प्रवास नृत्याव्दारे उलगडण्यात आला. तसेच जन्म, मृत्यू आणि मोक्षा असे मनुष्याचे जीवनचक्र नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आले.