आरोपींकडून ६ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : अवघ्या एक तासाच्या आत घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात सदर बाजार पोलिस स्टेशनमधील गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले असून या प्रकरणी चोरट्यांकडून सहा लाख ५५ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी हारुन जलालसाब करकम (वय 74 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त शिक्षक) यांनी फिर्याद दाखल केली होती. ते बाहेरगावी गेले असताना चोरट्याने राहत्या घरात प्रवेश मिळवून कपाटातील २ लाख ७५ हजार व एकूण ८०.५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.
हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त यांनी सुचना दिल्या. गुन्हे प्रकटिकरण पथकातील पोसई नितीन शिंदे यांनी सागर सरतापे व इतर अंमलदार यांना बोलावून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या.
रोहित लक्ष्मण बाबावाले याने त्याच्या साथिदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी या चोरट्याला पाठलाग करुन पकडले. या प्रकरणी मुख्य चोर रोहित लक्ष्मण बाबावाले (वय 25 रा. काळभैरव मठाजवळ, बापुजी नगर सोलापूर) सह त्याचा सहकारी विशाल रमेश बाबावाले (वय 27, रा. काळभैरव मठा जवळ, बापुजी नगर सोलापूर) यांनी चोरी केल्याचे उघड झाले.
त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.चोरट्यांनी त्यांच्या कडील २ लाख ५३ हजार रुपये व सुमारे २ लाख रुपये किमतीच्या 40 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या काढून दिल्या व आरोपी विशाल रमेश बाबावाले याने सुमारे ४०.५ ग्रॅम वजानाचे सोन्याचे २ लाख २ हजार ५०० रुपये किमतीचे असे एकूण ८०.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम २ लाख ५३ हजार रुपये असे ६ लाख ५५ हजार ५०० रुपये किंमतीचा चोरलेला माल परत केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-2 अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्यासह सागर सरतापे, औदुंबर आटोळे, संतोष मोरे, शहाजहान मुलाणी, राजेश चव्हाण, लक्ष्मीकांत फुटाणे, मल्लू बिराजदार, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, अबरार दिंडोरे, हणमंत पुजारी, शोभा कुंभार, नंदू व्हटकर, लक्ष्मण राठोड, इरफान नदाफ यांनी केली आहे.
