आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शेतकऱ्यांना उर्वरित पिक विमा रक्कम देण्याची मागणी

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

भूम : या वर्षी संपूर्ण शेतक-यांचे प्रत्यक्षात जास्त नुकसान झालेले असल्याने सरसकट पेरणीअगोदर सर्व शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के सोयाबीन पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी महाविकास आघाडी भूम -परंडा -वाशी विधानसभा मतदासंघाच्या वतीने उपविभागिय अधिकारी यांना करण्यात आली.

परंडा भूम वाशी मतदार संघामध्ये मागील खरीप हंगामात पावसात प्रचंड प्रमाणावर खंड पडला होता. शेतक-यांनी पिक विमा भरून संरक्षीत केलेल्या सोयाबीन सहीत सर्व खरीप पिकाचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले होते.

या परीस्थितीमुळे शेतक-यांना 25% अग्रीम पिक विमा मिळावा यासाठी विविध राजकीय, अराजकीय संघटनांनी मागणी केली होती आणि शासन निर्णयातील तरतुदी नुसार शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा नुकसान भरपाई मिळाली होती.

परंतु मोठ्या प्रमाणावर पडलेला पावसाचा खंड, दुष्काळ यामुळे मतदार संघातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले म्हणून त्यांना उर्वरीत 75% नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे.
त्याच प्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पिक विमा नुकसानीच्या मागील 7 वर्षापैकी दुष्काळाचे 2 वर्ष वगळता उर्वरीत 5 वर्षाचे सरासरी उत्पन्न गृहीत धरून उंबरठा उत्पादन निश्चित केले जाते.

भूम परंडा वाशी जिल्हा धाराशिव मध्ये पिकाच्या ऐन वाढीच्या, फुलोरा, शेंगा व दाणे भरणेच्या काळात पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाईसदृश परीस्थिती निर्माण होऊन पिकाच्या उत्पादनात सातत्याने घट दिसून येत असल्याने त्याचा परिणाम उंबरठा उत्पादनावर देखील दिसून येत आहे.

परीणामी उंबरठा उत्पन्न कमी झाल्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांचे नुकसान होऊन देखील उंबरठा उत्पन्नाच्या आधारे शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

यामुळे शासन निर्णयातील नुकसानीच्या (परीगणनेकरीता) मागील 7 वर्षांपैकी दुष्काळाचे 2 वर्ष वगळता उर्वरीत 5 वर्षाचे सरासरी उत्पन्ना ऐवजी मागील सलग 10 वर्षातील अधिक उत्पादन आलेल्या 3 वर्षाचे सरासरी उत्पादन गृहीत धरून उंबरठा उत्पादन निश्चित करणे योग्य राहील.

जेणे करून उंबरठा उत्पादनात वाढ होऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना अधिकची विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी फायदा होईल. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास शाळू, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत पाटोळे, भूम कॉग्रेस चे तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, शिवसेना तालुका प्रमुख ॲड श्रीनिवास जाधवर, शिवसेना नेते दिलीप शाळू महाराज, भूम परंडा वाशी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज सय्यद शेखापूरकर, विधानसभा युवा सेना प्रमुख प्रल्हाद अडागळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश साठे, माजी सभापती रमेश मस्कर, राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब मस्कर, रामेश्वरचे उपसरपंच श्रीराम खंडागळे, माजी शिवसेना शहरप्रमुख दिपक मुळे, काँग्रेसचे महादेव जाधव असलम पठाण, भरत खरात हे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.