१७ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३५ हजारांच्या रिवार्डची घोषणा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
मोहोळ : विविध ठिकाणी झालेल्या १९ जनावरांच्या चोऱ्या पकडण्यात यश आले असून या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या अंतर्गत १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आदर्श ऊर्फ पांडू दत्तात्रय चव्हाण (वय २२, रा.विस्थापित नगर पंढरपूर सध्या धाराशिव), अजय दत्ता पवार (२१), नेताजी मोतीराम पवार (२३) श्याम ऊर्फ बबल्या सुनील पवार (२३), भीमराव ऊर्फ बिंद्रा छगन पवार (३८, रा. सांजा जिल्हा धाराशिव), आकाश ऊर्फ पपन्या चव्हाण (रा. बेंबळी तालुका धाराशिव) कान्हा दिलीप चव्हाण (रा. करकंब,तालुका पंढरपूर हल्ली उत्तर सोलापूर) राजा पवार (रा. सांजाया) आठ जणांची नाव निष्पन्न झाली असून, यापैक पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी माध्यमांना दिली.
पोलीसांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ३५ हजारांचे रिवार्ड देण्याची घोषणा ही पोलीस अधीक्षकांनी यावेळी केली. मोहोळ, कामती, करकंब, बार्शी, कुर्डवाडी, वैराग आदी ठिकाणी जनावरांच्या चोऱ्या झाल्याबाबत गुन्हे दाखल झाले होते. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ते विषयक गुन्हे विरोधी मोहीम उघडण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी पथके तयार करण्याच्या दिलेल्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात डीबी पथकाची निर्मिती केली होती.
त्या पथकाने बारकाईने तपास करून १३ गायीसह एक पिकअप जीप असा १७ लाखांच्या मुद्देमालासह ५ आरोपींना अटक केली आहे. या जनावरांच्या चोरीची उकल झाल्याबाबत माहिती देण्यासाठी मोहोळ पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, मोहोळ पोलीस ठाणे हददीतील ग्रामीण भागात सारोळे, देगाव, ढोकबाभुळगाव, नजीक पिंपरी, अर्जुनसोंड, शिरापुर, पेनूर, खंडाळी, चिखली व इतर भागात मागील ८ महिन्यापासून शेतकऱ्यांच्या जीं गाई व म्हशी चोरीचे सत्र सुरु होते. अतिशय सतर्कपणे आणि कसोशीने प्रयत्न करुन मोहोळ डि.बी पथकाने गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तपास केला. तसेच रेकॉर्ड वरील आरोपींची माहीती काढुन संशयीत व्यक्तींच्या रोजच्या हालचालीवर बारकाईने लक्ष देवून तपास केला.
सदर ठिकाणची सी.सी.टि.व्ही फुटेज तपासले. त्याच प्रमाणे पंढरपुर, सोलापूर तालुका, बार्शी, मंगळवेढा हद्दीत ही तपास केला. मोहोळ पोलीस ठाणे कडील डि.बी पथकाने सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांच्याकडुन मिळणाऱ्या तांत्रिक माहीतीच्या आधारे तपास सुरु केला. सदर माहितीच्या आधारे काही संशयीत व्यक्तींची नावे मिळाली. त्या संशयीत व्यक्तींचा गुप्तपणे अभ्यास चालु ठेवला असता अलीकडील काळात ते कोठे येत-जात होते, तसेच त्यांनी काय खरेदी विक्री केली, त्यांच्या रोजच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवून त्यांची माहिती काढुन त्यातुन त्यांनी सदरचे जनावर चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाल पोलिस शिपाई प्रवीण साने, पोलिस शिपाई प्रशांत भागवत, पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन माने, पोलिस हेड कॉन्स्टेबल रंनजित भोसले, सिद्धनाथ मोरे, अमोल जगताप, अजित मिसाळ स्वप्निल कुबेर, संदीप सावंत, सुनील पवार, सायबर पोलिस ठाणेकडील पोलिस हेड कॉन्स्टेबल युसूफ पठाण यांनी केली आहे.
