आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी बांबू लागवडीस प्राधान्य द्या- प्रविण दराडे

Spread the love

पुणे : जागतिक तापमानवाढीमुळे हवामान बदलाचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी बांबू लागवडीस प्राधान्य द्यावे आणि मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करावी, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी केले.

मनरेगा अंतर्गत बांबू व फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी विधान भवन येथे पुणे विभागातील विविध विभागांचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थाच्या पदाधिकारी यांच्यासाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनरेगा महासंचालक नंदकुमार, मनरेगा आयुक्त अजय गुल्हाणे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, कुमार आशिर्वाद, राजा दयानिधी, जितेंद्र डूडी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, रोजगार हमी योजना उपायुक्त वैशाली इंदाणी ऊंटवाल, विभागीय कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी, बी.जी. बिराजदार आदी उपस्थित होते.

प्रविण दराडे म्हणाले, मागणी लक्षात घेता दरवर्षी सुमारे एक लाख बांबू लागवड करण्याचे नियेाजन आहे. बांबूची लागवड, त्यावरील प्रक्रिया आणि विक्री सुलभतेने होण्यासाठी तालुकास्तरावर बांबू डेपो स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी समन्वय अधिकारी नेमण्यात येणार आहे. बांबू लागवडीसाठी शासनाच्यावतीने प्रती हेक्टर सात लाख रुपये अनुदान देण्यात येत असल्याची माहिती प्रविण दराडे यांनी दिली.

कार्य शाळेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी चंद्रपूर येथील बांबू प्रशिक्षण केंद्र आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात बांबूपासून निर्मिती केलेल्या वस्तू, पर्यटन केंद्राच्या ठिकाणची निवासव्यवस्था आणि तेथील बांबूचा वापर पाहण्यासाठी आवर्जून भेट द्यावी अशी सूचनाही त्यांनी केली.कार्यशाळेत विभागातील वन विभाग, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले.