कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बेल्टची ऑनलाइन खरेदी एकाला महागात पडली आहे. सायबर चोरट्यांनी बेल्ट विक्रीच्या निमित्ताने त्यांच्या बँकेचे तपशील मिळवून १ लाख ११ हजार रुपयांना गंडा घातला आहे.
एका ज्येष्ठ नागरिकाला बेल्ट हवा होता. एका कंपनीच्या अॅपवरून त्याने सर्च केला आणि ऑनलाइन मागवला. मात्र हीच खरेदी त्यांना चांगलीच महागात पडली. या प्रकरणी भाग्योदयनगर येथील ६४ वर्षीय व्यक्तीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार १० ते २८ मे २०२४ या दरम्यानच्या काळात घडला आहे. फिर्यादीने एका नामांकीत’ कंपनीच्या अॅपवर बेल्ट ऑर्डर केला होता. मात्र अॅप्लिकेशनवर बेल्ट उपलब्ध नसल्याने फिर्यादींनी ऑर्डर रद्द केली.
फिर्यादींना ऑर्डरचे रिफंड न मिळाल्याने त्यांनी गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधला. सायबर चोरट्यांनी कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. खरेदीसाठी लिंक पाठवत असून त्यावर क्लिक करून अॅप्लिकेशन डाऊनलोड करा, असे सांगितले.
फिर्यादींनी अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर समोरील व्यक्तीने त्यांच्या मोबाइलचा संपूर्ण ताबा मिळवला. तुमच्या खात्यावर पैसे पाठवले आहेत चेक करा, असे सांगून बँक खात्याची खासगी माहिती चोरली. खासगी माहितीचा वापर करून फिर्यादींच्या बँक खात्यातून १ लाख ११ हजार रुपये परस्पर काढून घेतले. हा तपास पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.
