मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर भक्तीमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा…विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्याचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की, राज्यातील शेतकरी, कामगार व कष्टकरी सुखी झाला पाहिजे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेल्या १०३ कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले असून आतापर्यंत ८ लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, १५ लाख नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. विठ्ठल रुक्मिणी मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार शेतकरी बाळू शंकर अहिरे, (वय ५५ वर्षे) व आशाबाई बाळू अहिरे (वय ५० वर्षे) (मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक) या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना १ वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात आले. संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, देहू यांना १ लाखाचा प्रथम पुरस्कार मिळाला. दानेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे यांना ७५ हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाले तर श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, इंदापूर यांना ५० हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या सर्व पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या सुविद्य
पत्नी लता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा पार पडली.
