चंदननगर पोलिसांची गुजरात मध्ये जाऊन कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने सायबर फसवणुक करणाऱ्या टोळीला भूज(गुजरात) मधुन जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद होता. पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने भूज मध्ये जाऊन तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी यांना दि. १५ जानेवारी २०२४ ते ०७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अनोळखी व्यक्तीने टेलिग्रामव्दारे संपर्क साधला. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो असे सांगुन सुरूवातीला तक्रारदार यांना चांगला परतावा मिळवुन देवुन विश्वास संपादन केला.
त्यांच्याकडुन मोठ्या प्रमाणावर फॉरेक्स ट्रेडिंग करिता २८,००,०००/- रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर प्राप्त करुन घेतले. पैसे प्राप्त झाल्यानंतर तक्रारदार यांना नफा तसेच मुळ रक्कम परत न देता तक्रारदार यांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाल्यामुळे चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरचे बँक खाते धारक हे भुज, गुजरात या राज्यातील असल्याचे समजुन आले. खात्याला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांक व जी-मेल आयडीची माहिती घेतली असता सदर मोबाईलचे लोकेशन व जीमेलच्या आयपी अॅड्रेसवरुन प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन हे भूज, गुजरात राज्यामधील असल्याचे दिसून आले.
चंदननगर पोलीस स्टेशन येथील सायबर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, पोलीस अंमलदार उकिर्ड पानपाटील तेथे गेले. प्राप्त मोबाईल क्रमांकाचे लोकेशन नुसार सिटी ए डिव्हीजन पोलीस स्टेशन, भूज, गुजरात येथील स्थानिक पोलीसांची मदत घेतली व फसवणुक करणाऱ्या मोबाईल धारक नाकर रोनक आश्विनभाई (वय-२८ वर्षे रा. कैलासनगर शिव मंदिर बाजूला एसटी वर्क शॉपजवळ भूज, गुजरात) यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याच्या इतर साथीदार शहा मोहितकुमार दिनेशभाई, सोधा दिव्यराजसिंग अमरसंग व इतरांच्या मदतीने गुन्हा केल्याचे सांगितले. त्याचे साथीदार यांचा स्थानिक पोलीसांच्या मदतीने शोध घेतला असता आरोपी शहा मोहितकुमार दिनेशभाई (वय २७ वर्षे रा. वनिया व्यास अंगिया मोठा नखतराणा जिल्हा. कच्छ) सोधा दिव्यराजसिंग अमरसंग (वय-२४ वर्षे रा. कोठारा ता. हावडासा जिल्हा कच्छ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांचा गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे दिसून आल्याने त्यांना अटक केली.
सदरची कामगिरी ही पोलीस उपआयुक्त परि ०४, विजयकुमार मगर, सहा पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, उकिर्डे, पानपाटील, वानखडे, डहाळे, थोरात यांनी केली.
