आवृत्ती पुणे
← Back to Homepage

धर्म हाच जीवनाच्या परिवर्तनाचा खरा मार्ग : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

Spread the love

पुणे : धर्म हाच जीवनातील परिवर्तनाचा खरा मार्ग आहे. दुःखातून मुक्त होऊन आपल्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य राहिल असा प्रयत्न करा. कारण तोच मोक्षाचा मार्ग आहे हे लक्षात घ्या. आपल्या आत्म्याचे मूळ स्वरुप आनंदस्वरुप आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे कोणत्याही कारणाने दुःखी व्हायचे नाही हे मनाशी पक्के करा, असा मोलाचा संदेश पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी आज दिला.

वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचनमालेत त्यांनी आज मौलिक असे जीवन बोधामृत दिले. प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनी ही मार्गदर्शन केले. भाविक मोठ्या संख्येने प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित होते.

पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, जीवनात सुखी होण्यासाठी आपल्या विकृतींपासून मुक्त व्हायला हवे. त्यासाठी मनात ज्या विकृती निर्माण होतात त्याकडे पाहायला शिका. जेव्हा असे होईल तेव्हा त्यातील पुढचे धोके ओळखून तुमचा अंतरात्माच तुम्हाला सावध करेल.

समोर एखादा खड्डा दिसत असेल तर आपण त्यात जाऊन पडू का, अग्नी असेल तर भाजेल हे माहित असून त्यात हात घालायला जाऊ का तसेच जेव्हा विकृतीचे धोके आणि दुष्परिणाम लक्षात येतील तेव्हा ते ज्ञानच आपल्याला सावध करेल.

आपल्याला आपले हात मलीन झालेले चालत नाहीत मग आपला आत्मा मलीन झाला तर ते आपल्याला चालेल का? पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी पुढे म्हणाल्या, एकवेळ जगाला समजून घेणे सोपे आहे परंतु आपल्या अंतरंगातील प्रवृत्ती समजून घेणे तितकेसे सोपे नाही. विकृतींतून मुक्त होण्याचा प्रयत्न म्हणजेच साधना.

दुर्विचार, दुष्कृत्य या पासून वाचण्यासाठी आपल्याला स्वतःमध्येच डोकवावे लागेल. कारण आपले कल्याण फक्त आपणच करू शकतो. आपण दुःखीसुद्धा स्वतःमुळेच होतो हे लक्षात घ्या. आत्म्याचे मूळ स्वरुप हे आनंदस्वरुप आहे. दुःख मात्र आपण बाहेरून आणतो. कारण दुःखी राहणे हा आपल्या आत्म्याचा मूळ स्वभवाच नाही.

साधनेत जी व्यक्ती रममाण झालेली असते ती कधी दुःखी राहूच शकत नाही. जे आहे ते माझ्यामुळेच आहे हा स्वीकार झाल्याने इतरांवर दोषारोप न करता स्वतःत सुधारणा करण्यावर ती व्यक्ती भर देते.

त्यामुळे आपल्या घरात जर कुणी दुःखी असेल तर ते दूर करण्यासाठी काय करायला हवे, जीवनशैली बदलण्याचा मार्ग कोणता सांगायला हवा हे जरी आपल्या लक्षात आले आणि तसे कृतीशील झालो तरी आपल्याला धर्माचा अर्थ समजला असे म्हणता येईल. संपूर्ण चातुर्मासाचा हाच खरा सार आहे.

प. पु. साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, आपल्या जैन धर्मामध्ये ३६ हजार साध्वी आणि १४ हजार साधू आहेत. स्त्रियांची संख्या अधिक असतानाही आजवर जैन धर्मात स्त्रियांना आचार्य ही पदवी मिळालेली नव्हती. परंतु प. पु. अमरमुनिजी यांनी प्रथमतः प. पु. चंदनाजी यांना आचार्य या उपाधीने गौरवले.

जैन धर्मात ही पदवी असणाऱ्या त्या पहिल्या साध्वी ठरल्या. त्यांनी जैन धर्मात नव्या मार्गाची स्थापना केल्याने त्यांना आचार्य म्हटले जाते हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यांचे विचार ऐकून आपल्यात परिवर्तन घडू शकते.

जी कृती करू ती पूर्ण सजगतेने होईल असा प्रयत्न करायला हवा. भावना वेगळ्या आणि मी वेगळा अशा दृष्टीने स्वतःकडे पाहता यायला हवे. स्वतःला पाहता येणे हीच खरी मौलिक साधना आहे.

या विशेष प्रवचन मालेसाठी वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड, जितू तातेड हे प्रयत्न करीत असून आजच्या या विशेष प्रवचनासाठी उद्योगपती सुनील नहार, अजय भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

get_footer();