महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२४ जाहीर झाला आहे. बाहेरील जिल्ह्यातील जुने एम.टी.सिरीजचे कृष्णधवल मतदार ओळखपत्र असलेल्या आणि जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही मतदारांकडे एमटी सिरीजमधील जुने कृष्णधवल मतदार ओळखपत्र आढळून आले होते. या ओळखपत्राचा पुरावा म्हणून वापर करीत त्यांना मतदान करायचे होते. ते इतर जिल्ह्यातील असल्याने आणि पुणे जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही.
अशा मतदारांनी मतदार नोंदणीसाठी नव्याने अर्ज सादर करावा आणि जिल्ह्यातील संबंधित मतदारसंघात नोंदणी करावी. जिल्ह्यात १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित हा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत.
पुनरीक्षण मोहीम कालावधीत नवीनमतदारांची नाव नोंदणी करणे, मयत मतदारांचे, स्थलांतरित मतदाराचे नाव वगळणे आदीसारखे कार्यक्रम राबविले जातील. जिल्ह्यात १८ ते ११ वयोगटातील युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
नागरिकांनी मतदार यादीत ऑनलाइन नावनोंदणीसाठी किया तपशिलात बदल करण्यासाठी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला किया व्होटर हेल्पलाइन या मोबाइल अॅपला भेट द्यावी. ऑनलाइन अर्जाची प्रत मतदार नोंदणी अधिकारी किया तहसील कार्यालयात सादर करता येईल.
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी विविध जनजागृती कार्यक्रमात सहभाग घ्यावा, तसेच मतदार नोंदणी न केलेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी. जुने ओळखपत्र असल्यास नव्याने काढून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
