आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रिक्षाचालकाचा शाळेत चाललेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार

Spread the love

पुणे : लोणी गावातून शाळेत चाललेल्या आठवीच्या विद्यार्थिनीला शाळेत सोडतो, असे म्हणून रिक्षाचालकाने बळजबरीने रिक्षात बसविले आणि शाळेत सोडविण्याच्या ऐवजी स्वतः घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात मंगळवारी (दि.०६) सकाळी दहा ते दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात रिक्षाचालकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. विजय वसंत जाधव (वय २४, रा. पाषाणकरबाग, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती दररोज शाळेला रिक्षा अथवा बसमधून जात असते. दरम्यान, पीडित मुलगी मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत चालली होती.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रिक्षाची वाट पाहतथांबली होती. तेव्हा तोंडओळखीचा रिक्षाचालक विजय जाधव तेथे आला व अल्पवयीन मुलीला म्हणाला, चल तुला शाळेला सोडवतो. अल्पवयीन मुलगी रिक्षात बसल्यानंतर आरोपी मुलीला म्हणाला, तुझ्या आईचा फोन आला होता, तुझी आई मी राहत असलेल्या घरी येणार आहे.

असे खोटे सांगून मुलीला घरी घेऊन गेला. त्यानंतर मुली सोबत लगट करून बळजबरी करू लागला, तसेच मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करू लागला. मात्र, आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी जोरजोरात ओरडू लागली.

तेव्हा आरोपी तेथून पळून गेला. याप्रकरणी पीडिता यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विजय जाधव याच्यावर विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विजय जाधव हा फरार झाला आहे.