गुन्ह्याचा तपास सीआयडी करणार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला शनिवारी (दि.१० ऑगस्ट) पोलिस कोठडीत चक्कर आल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
कोठडीत झालेल्या मृत्यूमुळे गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. सचिन अशोक गायकवाड (वय ४७, रा. मुंढवा) असे पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अशोक गायकवाड हा विश्रामबाग येथील पोलिस कोठडीत असताना त्याला अचानक चक्कर आली. पोलिसांनी लगेचच त्याला रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन अशोक गायकवाड आणि मनोहर रमेश माने (३६) या दोन्ही संशयित आरोपींना पर्वती पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांना ७ तारखेला रात्री नऊच्या सुमारास अटक करून वैद्यकीय तपासणीनंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले. या गुन्ह्यात दोघांची पोलिस कोठडी घेण्यासाठी त्यांना ८ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघांनाही १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मृत्यू झालेल्या अशोकचा पूर्वीचा वैद्यकीय इतिहास होता. याबाबत त्याच्या नातेवाइकांनाही माहिती आहे. त्याचा शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पुढील तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.अशी माहिती संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३ संभाजी कदम यांनी दिली.
९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अशोक गायकवाड हा विश्रामबाग येथील पोलिस कोठडीत असताना त्याला अचानक चक्कर आली. पोलिसांनी लगेचच त्याला रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले.














