आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आधार प्रमाणीकरण न केल्याने अनेकांना बसला फटका

Spread the love

पुणे : ‘राज्यातील ३३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना ‘आधार’च्या प्रमाणीकरणा अभावी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे योजनेंतर्गत मिळणाऱ्या ५० हजार रुपयांचा लाभ त्यांना मिळाला नाही. हा लाभ मिळविण्यासाठी येत्या ७ सप्टेंबर पर्यंत बँक खात्याशी आधार क्रमांक जोडावा (लिंक) लागणार आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. योजनेत २०१७-१८, २०१८-१९ २०१९-२० या तीन वर्षांत पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अल्पमुदत पीककर्ज ठरावीक मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ स्वरूपात दिली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी २०१८-१९ आणि २०१९- २० या वर्षांत ५० हजार रुपयांपेक्षा कमी कर्ज घेतले आहे, अशांना कर्जाच्या मुद्दलाइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे.

हा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी; तसेच ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बँकेच्या खात्याशी जोडला नव्हता. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित राहावे लागले.