बार्शीतील संघटना उतरल्या रस्त्यावर, फाशीची मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे राज्यात तीव्र पडसाद उमटत असताना बार्शीतही विविध सामाजिक संघटना, महिला, राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत याला जबाबदार असलेल्या आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे.
याबाबत बार्शीतील पालक समितीच्यावतीने राज्यपाल यांना तहसीलदारांमार्फत् निवेदन देखील पाठविण्यात आले आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या जिल्हा शाखेच्या वतीने संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल अजबे व राज्य संघटक संदीप अलाट यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणातील नराधमांना फाशी दिली पाहिजे, या प्रकरणाशी संबंधित शाळा संचालक व शालेय प्रशासनावर पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, मुली व महिलांच्या सुरक्षतेची हमी देऊ न शकणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी या घटनेची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामे द्यावेत, बदलापूर घटनेचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबद्दल अपशब्द वापरणाऱ्या बदलापूरच्या माजी नगराध्यक्षा विरुद्ध गुन्हा दाखल करावा.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, हर्षद लोहार, शिवसेना उबाठाचे शहर अध्यक्ष दिनेश नाळे उपस्थित होते. दलित महासंघ बार्शीच्या वतीनेही कारवाई करण्याबात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील अवघडे, जिल्हा उपाध्यक्ष नीलेश खुडे, शहर अध्यक्ष संदीप अलाट व कार्यकर्ते उपस्थित होते.