आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्वतःकडे पाहायला शिका : प. पु. आचार्य श्री चंदनाजी

Spread the love

पुणे : स्वतःकडे पाहायला शिका. ही महत्त्वपूर्ण गोष्ट आपण शिकायला हवी. जीवनाच्या खजान्याची चावी, जीवनाची शांती, परम आनंद मिळवायचा असेल तर ते जिथे हरवले आहे तिथेच शोधा. ते नेमकेपणाने सांगण्याचे काम गुरू करीत असतो, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी एका छोट्या गोष्टीने जीवनाचे सूत्र उलगडले. त्या म्हणाल्या, एक माणूस रस्त्यावर काहीतरी शोधत होता. एकाने येऊन त्याला विचारले की आपण काय शोधत आहात. तो म्हणाला, माझी तिजोरीची चावी हरवली आहे ती शोधतोय. त्या माणसाने विचारले, “इथेच हरवली होती का?” त्यावर तो माणूस म्हणाला, “नाही, चावी तर घरी हरवली आहे.

पण घरात काळोख आहे, इथे प्रकाश आहे म्हणून मी इथे शोधतो आहे.” अशा व्यक्तीला त्याची हरवलेली चावी मिळेल का? जिथे हरवले आहे तिथे शोध घ्या. तेव्हाच चावी सापडेल. प. पु. आचार्य श्री चंदनाजी पुढे म्हणाल्या, चांगल्या गोष्टी होताना पाहून आपले मन आनंदाने भरून जायला हवे.

चांगले गुण पाहून, सत्कर्म पाहून, त्याचे चांगले विचार पाहून जर आपले मन प्रसन्नतेने भरून जात असेल, तर ती प्रभावना आहे हे लक्षात घ्या. आपला वात्सल्यभाव दूषित होणार नाही याची काळजी घ्या. प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, वीरायतनचे काम आज सर्वदूर पोहोचले आहे. ते अनेकांच्या प्रयत्नांतूनच इतक्या मोठ्या पातळीवर गेले आहे. वीरायतनचे जिथे जिथे काम सुरू आहे, त्या मध्ये सर्वांत उत्तम असे काम राजस्थानमधील कच्छमध्ये सुरू आहे. येत्या २६ जानेवारीला तिथे मोठा कार्यक्रम होणार आहे.

त्यासाठी देशभरातून, जगभरातून लोक मोठ्या संख्येने एकत्र येतील. त्यावेळी पुण्यातील लोकांनी मोठ्या संख्येने यावे. तिथे राहण्याची व जेवण्याची सगळी व्यवस्था केली जाईल. १५० एकर जागेमध्ये हा आश्रम विस्तारलेला आहे. प. पु. साध्वी श्री शिलापीजी मार्गदर्शन करताना म्हणाल्या, सम्यक दर्शनामध्ये वात्सल्य महत्त्वाचे मानलेले आहे.

प्रार्थना ही एक गोष्ट वेगळी आहे. प्रेम ही गोष्ट वेगळी आहे आणि वात्सल्य या सर्वांहून वेगळे आहे. अनेकजण ताई माँ ना करुणामूर्ती नाही तर वात्सल्यमूर्ती म्हणतात. करुणा आणि वात्सल्य यात फरक आहे. आई जे मुलासाठी करते त्यात वात्सल्य असते. ते उत्स्फूर्त असते.

त्यात कृपा किंवा उपकाराची भावना नसते. आचार्य म्हणतात की जसे आई मुलांवर प्रेम करते, तशास्वरुपाचे वात्सल्य भाव हे सम्यक दर्शनातील सातवे अंग आहे. ईश्वराचेच दुसरे रुप म्हणजे पृथ्वीवरचे आईचे रुप आहे. तिचा जो भाव आहे तोच वात्सल्याचा भाव असतो.

भगवान महावीरांना ४२ व्या वर्षी केवलज्ञान प्राप्त झाले आणि ७२ व्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. याचा अर्थ त्यांनी ३० वर्षे आपल्याला ज्ञानामृत दिले. सर्व जीवांच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी ते बोलले. फूल उमलते तेव्हा तो सुगंध देतो. सूर्य उगवतो तेव्हा प्रकाश देतो.

त्याप्रमाणे भगवान महावीर बोलतात तेव्हा वात्सल्य भरभरून मिळते. ते सहजभावाने सारे काही देतात. आपणही असेच वात्सल्य देणारे बनावे. आपल्याला जे काही प्राप्त होते ते द्यायला शिकले पाहिजे. मात्र ते देताना वात्सल्यभाव असला पाहिजे.

ईश्वराचे वात्सल्य हे अनंत आहे. देवाच्या वात्सल्यात भेदभाव नाही. जी गोष्ट सहजतेने मिळते, त्याचे आपल्याला मोल नसते, पण जी गोष्ट कष्टपूर्वक मिळते, त्याचे मोल असते. त्यामुळे आपल्याला ईश्वराची भक्ती करताना ती मनापासून करावी.