आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आपल्या जीवनातही कृष्ण मार्गदर्शक : पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी

Spread the love

पुणे : आपल्या जीवनातही असे अनेक प्रसंग येतात, जिथे आपल्याला कृष्ण मार्गदर्शक ठरतो. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे विचार पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी मांडले.

वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेत त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन सुरू आहे. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त त्यांनी आज आपले विचार मांडले. यावेळी प. पू. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले.

पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, कृष्णजन्माष्टमी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कालचक्रामध्ये कितीतरी अष्टमी येतात, त्या सगळ्याच आपण लक्षात ठेवत नाही. परंतु कृष्णजन्माष्टमीचे महत्त्व मात्र वेगळे आहे. फारच मोजक्या तिथी असतात, ज्यावर महापुरुषांची मोहोर उमटलेली असते.

काळाच्या पटावर तो दिवस महत्त्वाचा ठरतो. लाखो अगणित प्राणी जन्माला येतात आणि जातात, परंतु त्यांची कुणी दखल किंवा वेगळी नोंद घेत नाही. पण श्रीकृष्णासारखी व्यक्तिमत्त्वे काळावर आपली मोहोर उमटवून जातात.

पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी पुढे म्हणाल्या, माणसं सुरक्षित राहावी यासाठी महापुरुष त्यांच्या परीने जे जे करणे शक्य असते ते सारे काही करतात. जगात दुष्ट, पापी असे अनेक लोक असतात, त्यांची संख्याही जास्त असते. पण आपल्याला प्रत्येक वेळी त्यांचा नाश व्हावा असे वाटत नाही, परंतु त्यांच्यापासून आपण सुरक्षित असावे असे नक्कीच वाटते.

महाभारताचे युद्ध टाळले जावे आणि लोक सुरक्षित राहावेत म्हणून कृष्णाने खूप प्रयत्न केले. अर्जुन आणि दुर्योधन या दोघांनाही काय हवे आहे हे विचारले. त्यासाठी मध्यस्थी केली. कृष्णाने दुर्योधनाला भर राजसभेत विचारले की हे युद्ध टाळायचे असेल आणि युद्धसंहार नको असेल तर फक्त पाच गावे पांडवांना द्यावीत, म्हणजे युद्ध थांबू शकेल हा सोपा पर्याय सुचवला होता.

परंतु दुर्योधनाने सांगितले की पांडवांना सुईच्या टोकावर राहू शकेल इतकी जमीनसुद्धा मी युद्धाशिवाय देणार नाही. त्यामुळे युद्ध अटळ ठरले. मान समर्पित केल्याशिवाय दान करता येत नाही.

दुर्योधनाचा अहंकार मोठा ठरला, त्यामुळे फक्त पाच गावे द्यायलाही त्याने नकार दिला, आणि त्या अहंकारातूनच पुढे महाभारताचे युद्ध घडले.आपल्याही जीवनात असे अहंकाराचे प्रसंग अनेकदा येत असतात. तेव्हा आपण कृष्णाचे स्मरण करावे आणि त्याने दिलेले मार्गदर्शन लक्षात ठेवावे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.