स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार मुकुंदनगर परिसरात घडला असून, स्वारगेट पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला अनोळखी तरुणाने मोबाईलवर संपर्क साधला. त्याने कंपनीच्या अॅपद्वारे चांगला आणि शाश्वत नफा मिळेल असे सांगून, अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवली.
त्यानुसार, फिर्यादीने अॅप डाऊनलोड केले. सुरुवातीला काही रक्कम त्यांच्या बँक खात्यावर क्रेडिट करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, फिर्यादीला २४,२७,१३४/- रुपये त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले.
पण, ट्रेडिंग आणि आयपीओमध्ये झालेला नफा देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही तो नफा देण्यात आला नाही. तसेच, ट्रान्सफर केलेली रक्कमही परत न देता फिर्यादीची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे करत आहेत.
