सहकारनगर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: मोबाईल कंपनींच्या टॉवरवरील महागड्या रिमोट रेडीओ युनीटची चोरी करणारा चोरटा जेरबंद करून त्याच्याकडून ५,७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०८ मार्च रोजी फिर्यादी सागर राजेंद्र मोरे हे नोकरीस असलेल्या एका कंपनीने केदार अपार्टमेंट, संभाजीनगर, धनकवडी पुणे व साई कृपा सोसायटी सहकारनगर पुणे येथे मोबाईल टॉवर बसवले होते.
सदर टॉवरवर एका कंपनीने ४ जी नेटवर्कसाठी रिमोट रेडीओ युनीट असे एकूण ९ नग मशीन बसवली होती. त्याची अज्ञात इसमाने चोरी केली होती. त्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यात यापूर्वी १) अक्षय शांताराम बोडके (वय २६ वर्षे, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) २) अशिष अशोक शिंदे (वय ३९ वर्षे, रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी) असे आरोपी अटक करण्यात आले होते.
दि. २७ ऑगस्ट रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहिहंडी सणानिमित्त पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर यांना बातमी मिळाली की, मोबाईल टॉवरवरील किंमती मशीन चोरी करणारा एक इसम के. के. मार्केटच्या पुढे भंगाराच्या दुकानाजवळ चोरीच्या रिमोट रेडीओ मशीन पोत्यात घेऊन विक्रीसाठी येणार आहे.
सदरची माहिती सहकारनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांना कळविली असता, त्यांनी लगेच सपोनि सागर पाटील व अंमलदार यांची टीम तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी जाऊन छापा टाकून आरोपीस त्याच्याकडील पोत्यातील मालासह ताब्यात घेतले.
दिलशाद मोहमद रफिक (वय ३२ वर्षे, रा. कुलउत्सव सोसायटी, खड़ी मशिन चौक, कोंढवा पुणे, मुळ उत्तर प्रदेश) याने चौकशी दरम्यान कबूल केले की, सदरचा गुन्हा त्याने आपल्या साथीदार अक्षय बोडके, अशिष शिंदे (दोघे रा. बिबवेवाडी) यांच्यासह केला आहे.
त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण ५,७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलिस स्टेशन छगन कापसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार सागर सुतकर, खंडू शिंदे, अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, सागर कुंभार, अमित पदमाळे, विशाल वाघ यांनी केली आहे.
