गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : धनकवडी येथील शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा लोकनेते शरदचंद्र पवार सभागृहात मोठ्या दिमाखात, उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
भोर वेल्हा तालुक्यातील समविचारी मंडळींनी एकत्र येऊन सन २००१ मध्ये या पतसंस्थेची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत संस्थेला सातत्याने ‘अ’ वर्ग मिळत आला आहे. २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष ईश्वरलाल खोपडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या प्रसंगी व्यासपीठावर उद्योजक नानासाहेब भिताडे, हभप आर. के. रांजणे, स्वीकृत नगरसेवक युवराज रेणुसे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे, माजी नगरसेवक विशाल तांबे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ धाडवे, ज्येष्ठ संचालक गोविंदराव थोपटे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय खेळाडू साहिल मरगजे, जानवी चोरगे, तसेच पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, खडकवासला मतदारसंघाचे युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल सोनवणे, वंडर सिटीचे नवनियुक्त संचालक डॉ. प्रदीप थोपटे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन बाजीराव गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रा. प्रदीप थोपटे यांनी केले. याप्रसंगी पतसंस्थेचे आजी-माजी संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
