महाराष्ट्र विद्यालयातील १९८० सालच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९८० साली इयत्ता १० वी ड च्या वर्गात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संत तुकाराम सभागृहात उत्साही वातावरणात संपन्न झाला.
या स्नेह मेळाव्यात माजी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक कालखंडातील संस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. यावेळी महाराष्ट्र विद्यालयातील माजी जेष्ठ शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या स्नेह मेळाव्यात समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत कर्तबगार व्यक्तींनी आपल्या प्रगतीपथावरील वाटचालीचे श्रेय आपल्या गुरूजनांनाच दिले व गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमास तत्कालीन १० वी ड च्या वर्गातील विद्यार्थी व महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाचे सल्लागार राजेंद्र मिरगणे, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, गणेश सोळंकी, शहाजी जाधव, रमेश काटे, अशोक पाटील, प्रदीप पडवळ, शिवाजी डोईफोडे, श्रीकांत ताकभाते, नागनाथ झांबरे, चंद्रकांत गटकळ, बाळासाहेब करंजकर, प्रमोद जाधव, अरूण शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी तत्कालीन कार्यरत शिक्षक व माजी मुख्याध्यापक दशरथ जगताप, भगवान गव्हाणे, उप मुख्याध्यापक संजय बागल, माईनकर, उत्तमराव मते, लक्ष्मणराव वाघमारे आदी गुरूजनांसह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी व महाहौसिंगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अत्यंत कृतज्ञतेने सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या व शाळेसाठी भेटवस्तू प्रदान करण्यात आली.
