पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अभिनव उपक्रमाची सुरूवात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणातील आरोपी हे पारधी समाजातील असल्याचे लक्षात आल्या नंतर या समाजातील लोकांना गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी “पहाट” हा अभिनव उपक्रमाची सुरूवात केली आहे.
सदर उपक्रमाची सुरूवात ०६ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉलमधील पारधी समाज बांधवाच्या मेळाव्याने केली आहे. पारधी समाजातील युवक हे रोजी-रोटीसाठी अनावधानाने गुन्हे करत असून त्यामध्ये अटक झाल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी पुन्हा गुन्हेगारी, पुन्हा अटक हे दुष्टचक भेदण्यासाठी पोलीस खात्याकडून मदत केली जाणार आहे.
तसेच या समाजातील लोकांना सरकारी योजना व नोकऱ्यांचा फायदा होण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड व जातीचा दाखला अशी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या वस्तीवर महसूल विभागाकडून विशेष कॅम्प आयोजीत केले जाणार असल्याची माहिती अतुल कुलकर्णी यांनी दिली.
तसेच या समाजातील शिक्षीत युवकांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी शिकवणी, भरतीपूर्व प्रशिक्षण यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणार असून बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देणार आहेत.
अतुल कुलकर्णी हे धाराशिव येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना हा उपक्रम राबवला होता. त्या मध्ये जिल्ह्यातील लोकांना भरतीपूर्व प्रशिक्षण, मुलांच्या शिक्षणासाठी शाळा, रोजगार उपलब्ध करून दिले असल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदा झाला असल्याची माहिती दिली.
सदर मेळाव्यास श्री. सरतापे, सहायक संचालक, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प हे हजर होते. त्यांच्या विभागाकडून पारधी समाजासाठी देण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली.
तसेच यापुढे पोलीस विभागाच्या माध्यमातून योजनांचा लाभ हा सर्व समाजापर्यंत पोहवणार असल्याची माहिती दिली. मेळाव्यास अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालायतील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. सोलापूर ग्रामीण यांनी केले.
