उत्तमनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घरासमोर राहणाऱ्या युवकाने २२ वर्षीय युवकाला, पोते उचलायचे आहे, असे सांगून घराबाहेर नेले. त्यानंतर युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर येथील जुनी मासे आळी येथे रविवारी (दि. ८) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (२२, रा. गुजर कॉम्प्लेक्स, मासे आळी, उत्तमनगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे, तर अमित सुदाम गुजर (२१, रा. सदर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी जयदीपची आई लक्ष्मी भोंडेकर (४२) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जयदीप रविवारी दुपारी घरात झोपलेला असताना आरोपी अमित त्याच्या घरी आला. त्याने “दादा, पोते उचलायला जायचे आहे, माझ्या सोबत चल” असे सांगून जयदीपला घराबाहेर नेले.
त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी अमितने जयदीपच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याचे लक्ष्मी भोंडेकर यांना समजले. लक्ष्मी भोंडेकर आपल्या मित्रांसोबत जुनी मासे आळीतील घर क्रमांक ७९६ येथे पोहोचल्या, तेव्हा जयदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
जयदीपला तातडीने रिक्षाने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचारादरम्यान सोमवारी (दि. ९) त्याचा मृत्यू झाला. जयदीपने उपचारादरम्यान आईला सांगितले की, अमितनेच त्याच्या डोक्यात कोयता मारला होता. सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
