सात पिस्तुलं, २३ जिवंत काडतुसे हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोणीकंद पोलिसांनी एन्जॉय ग्रुपमधील सात जणांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून देशी बनावटीची सात पिस्तुलं, २३ जिवंत काडतुसे, दोन वाहने आणि सात मोबाईल असा एकूण ९ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या टोळीतील गुन्हेगारांनी २९ ऑगस्ट रोजी कोलवडी परिसरात एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोन पथके तयार करून गुन्हेगारांचा शोध सुरू केला.
दरम्यान, लोहियानगरमधील एन्जॉय ग्रुपमधील सदस्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ग्रुपमधील शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७) आणि सुमीत उत्तरेश्वर जाधव (वय २६) यांना मुंढवा परिसरात सापळा रचून अटक केली.
तर अमित म्हस्कु अदचरे (वय २७), ओंकार ऊर्फ भय्या अशोक जाधव (वय २४), अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसवराज स्वामी (वय २६) आणि लतिकेश गौतम पोळ (वय २२) यांना सिंहगड रस्त्यावरील नवले पूल परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
मात्र, रौफ ऊर्फ लाला बागवान (वय २३) हा फरार आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनावणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे, संदीप तिकोने, कैलास जाधव, अजित अमोल ढोणे, शुभम चिनके, पांडुरंग दीपक कोकरे यांनी केली आहे.
