वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वानवडीत वाहतूक नियंत्रण करत असताना पोलिस आणि मार्शलला दोघांनी दारू पिऊन धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नयन शिवाजी भंडलकर (वय २५ वर्षे, रा. बी.टी. कवडे रोड, कुंदन इटर्निया, मुंढवा) आणि आशिष शिवाजी भंडलकर (वय २२ वर्षे) यांना अटक केली आहे.
सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. वानवडी पोलीस ठाण्यात अनिकेत वाबळे, पोलिस अंमलदार, यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांसह मार्शल ड्यूटी करत असताना, काही लोक दारू पिऊन गोंधळ घालीत असल्याचा पुणे शहर नियंत्रण कक्षाला कॉल आला होता.
फिर्यादी आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी जाऊन, त्यांना समजावत असताना, दारू पिऊन असलेल्या इसमांनी फिर्यादींना धक्काबुक्की करून, मारहाण आणि शिवीगाळ केली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रणिता सांगोलकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.
