आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस ठाण्यातच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Spread the love

पुणे : शिक्रापूर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला नागरिकांनी पकडून आणल्यानंतर, गुन्हा दाखल केला तर मी जीव देईल, असे म्हणून खिडकीवर डोके आपटून एका आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. परमेश्वर नागनाथ धेवडे असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई प्रतीक भाऊसाहेब जगताप (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी परमेश्वर धेवडे (वय २४, रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार बापू हाडगळे, पोलीस शिपाई प्रतीक जगताप, आणि महिला पोलीस शिपाई काजल सरोदे हे आपले कर्तव्य बजावत होते.

त्यावेळी एका युवतीचा मोबाईल हिसकावणाऱ्या परमेश्वर धेवडे या व्यक्तीला नागरिकांनी पकडून आणले. सदर व्यक्तीने फिर्यादी युवतीला “तुला नवीन मोबाईल देतो” असे म्हणत आरडाओरडा केला.

पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल करू नये, नाहीतर मी जीव देईन, असे म्हणून पोलीस ठाण्यातील खिडकीवर जोरात डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आरोपीच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागला.

त्यामुळे पोलिसांनी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. याबाबत पोलीस शिपाई प्रतीक जगताप यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव करत आहेत.