आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चोरट्याकडून साडेतीन लाखांचे १६ मोबाईल जप्त

Spread the love

पुणे : रेकार्डवरील मोबाईल चोरट्याकडून ३,७५,०००/- रुपये किमतीचे १६ मोबाईल फोन गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जप्त केले आहेत.

गणपती उत्सवानिमित्त पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी प्रताप मानकर व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करत होते.

पथकातील पोलीस अंमलदार विनोद चव्हाण, पुष्पेंद्र चव्हाण, शुभम देसाई यांना माहिती मिळाली की, पुणे स्टेशन परिसरात रेकार्डवरील आरोपी उमर सलीम शेख हा काळ्या रंगाच्या ब्लॅगमॅन मोपेडवर उभा आहे.

गुन्हे शाखा युनिट २ च्या अधिकाऱ्यांनी पुणे स्टेशन परिसरात जाऊन उमर सलीम शेख (वय १९ वर्षे, रा. ग.न. १, पिताश्री आश्रम जवळ, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यास ब्लॅगमॅन मोपेडसह ताब्यात घेतले.


त्याच्या मोपेडच्या डिकीत व त्याच्याकडील एकूण १६ मोबाईल फोन आढळले, जे जप्त करण्यात आले आहेत. सदर व्यक्तीच्या शर्टमध्ये मिळून आलेल्या मोबाईल फोनबाबत समर्थ पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस हवालदार संजय जाधव, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, शुभम देसाई आणि नागनाथ राख यांनी केली आहे.