आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

परदेशी नागरिकाला लुबाडणाऱ्या आरोपीला पकडले

Spread the love

पुणे : परदेशी नागरिकाला लुबाडणाऱ्या आरोपीला येरवडा पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १४ (सप्टेंबर) रोजी शास्त्रीनगर चौकात परदेशी नागरिक पायी चालत असताना, मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी इसमांनी फिर्यादीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरला.

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषण केले आणि तुषार खराडे व सुरज ओंबासे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली.

पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके आणि त्यांच्या टीमने संशयित दोन इसमांना पळून जात असताना शिताफीने पकडले. तपासात त्यातील एक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.

चौकशी दरम्यान, त्यांनी चोरी त्यांच्या तीन साथीदारांसोबत केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला ३०,०००/- किंमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि सुनिल सोळुंके, पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोना सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विजय अडकमोल यांनी केली.