पुण्यात पीएमआरडीए मार्फत लाभार्थ्यांचा गृहप्रवेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुवनेश्वर, ओडिसा येथे दि.१७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत देशातील ४ लाख लाभार्थ्यांचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार झाला. याचवेळी पुण्यात पीएमआरडीए मार्फत देखील या योजनेच्या लाभार्थ्यांचा गृहप्रवेश योगेश म्हसे, पीएमआरडीए आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
पंतप्रधान महोदयांचा मुख्य कार्यक्रम पी.एम.आर.डी.ए.मधून व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे जोडण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रातिनिधीक स्वरुपात निवडक लाभार्थी उपस्थित होते. तसेच लोकप्रतिनिधी व सहआयुक्त, जमिन व मालमत्ता विभाग, स्नेहल बर्गे, उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, तहसिलदार अभिजित जगताप व अभियांत्रिकी विभागातील कार्यकारी अभियंता विजय कांडगावे व राजू ठाणगे, उपविभागीय अभियंता रश्मी पाटील इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
आर्थिकदृष्टया दुर्बल व कमी उत्पन्न गट असणाऱ्या वर्गासाठी ही योजना राबवण्यात येते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनाची अंमलबजावणी २०१९ पासून होत आहे.
पी.एम.आर.डी.ए.मार्फत या योजनेअंतर्गत AHP (Affordable Housing Project) परवडणारी घरे व वैयक्तीक स्वरुपातील घरकुल स्वमालकीच्या जागेवर बांधण्यास अनुदान (BLC) -Beneficiary Led Construction या घटकाची अमंलबजावणी होत आहे.
योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना केंद्रशासनामार्फत १.५ लक्ष व राज्य शासनामार्फत १ लक्ष असे एकूण २.५ लक्ष अनुदान देण्यात येत आहे. प्रथम टप्पा / जोता बांधकाम पुर्ण -१ लक्ष, दुसरा टप्पा / छत बांधकाम पुर्ण – १ लक्ष व तिसरा टप्पा / बांधकाम पुर्ण-५० हजार रुपये अनुदान देण्यात येते.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे अंतर्गत तालुक्यामध्ये BLC (Beneficiary Led Construction) या घटका अंतर्गत ५३७१ लाभार्थी पात्र असून १६०० लाभार्थ्यांना आतापर्यंत संपूर्ण अनुदानाचे वाटप करण्यात आले असून उर्वरीत घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
अशी माहिती यावेळी देण्यात आली. सेक्टर १२ येथे परवडणारी घरे (AHP) या घटकाअंतर्गत ३३१७ घरकुलांचे बांधकाम पुर्ण झाले असून ३१०० लाभार्थ्यांना लॉटरी पध्दतीने लाभ देण्यात आला आहे.
