आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

Spread the love

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाअंतर्गत जिजाऊ पर्यटन केंद्र, चिंचवड येथील गणेशमूर्ती विसर्जन कुंडावर विशेष निर्माल्य संकलन मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेस शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेची शपथ ग्रहण केली. आणि शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्पही केला.

आम्ही शपथ घेतो की, आम्ही स्वत: स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहू आणि स्वच्छतेसाठी वेळही देवू. आम्ही स्वत: घाण करणार नाही, आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्व प्रथम आम्ही स्वत: पासून, आमच्या कुटुंबापासून, आमच्या गल्लीपासून, आमच्या गावापासून तसेच आमच्या कार्यस्थळापासून या स्वच्छतेच्या कामास सुरूवात करू.

आम्ही गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मोहीमेचा प्रचार करू. आम्ही आज शपथ घेत आहोत, ती आणखी १०० लोकांनाही घ्यायला लावू. आम्हाला माहिती आहे की, स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले आमचे पाऊल संपुर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल.

अशी स्वच्छता शपथ घेत नागरिकांनी ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाची भव्य सुरुवात झाली. शहरात राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी पाहणी केली.

यावेळी सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, किशोर ननावरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सहाय्यक आरोग्याधिकारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक, महापालिकेचे आरोग्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.