हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणारा तरुण हडपसर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून २५ हजार रुपयांची ३९ नशेची इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ सप्टेंबर रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशनचे संतोष पांढरे यांच्या आदेशानुसार, अर्जुन कुदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कवळे, पोलीस उपनिरीक्षक दिपक कांबळे, निलेश किरवे, अभिजीत राऊत यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला.
संशयित ओंकार अंगद बिनवडे (वय २१ वर्षे, रा. प्रगती नगर, गल्ली नंबर ३, काळेपडळ रोड, हडपसर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीतून मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) औषधाच्या बाटल्या सापडल्या.
त्याबाबत त्याची चौकशी केली असता, त्याने या औषधाचा वापर नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन ६०० ते ७०० रुपयांना विक्री करीत असल्याचे सांगितले. आरोपीच्या ताब्यात एकुण ३९ बाटल्या १५.५६१/- रुपये किमतीचा एम.आर.पी नुसार तसेच बाजारभावा नुसार २५,०००/- रुपये किमतीचा माल मिळून आला आहे.
आरोपी ओंकार अंगद बिनवडेवर हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या सूचना आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
या पथकात संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, दीपक कांबळे, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, अतुल पंधरकर, अमित साखरे, अमोल दणके, कुंडलिक केसकर, तुकाराम झुंजार आणि अभिजीत राऊत यांचा समावेश होता.
