अन्न व औषध प्रशासनामार्फत धडक मोहीम
पुण्यात १४ लाख ३५ हजार ९५८ किंमतीचा साठा जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सव काळात अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयामार्फत पुणे विभागामध्ये अन्न आस्थापनांच्या १०१ तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये दूध, खवा, पनीर, स्वीट मावा, तूप, बटर आणि नमकीन इत्यादी अन्नपदार्थांचे एकूण ११७ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. यामधून एकूण ९ लाख १९ हजार ५२० रुपयांच्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
पुणे जिल्हा आणि पुणे विभागात एकूण १४ लाख ३५ हजार ९५८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या मोहिमेत जिल्ह्यातील अन्न आस्थापनांच्या ४८ तपासण्या करण्यात आल्या.
विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे कारवाई करून भेसळीच्या संशयावरून विविध अन्नपदार्थांवर धाडी घालून जप्ती करण्यात आली.
या कालावधीत पुणे कार्यालयाने गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा आणि वनस्पती इत्यादी अन्नपदार्थांचे ५ लाख १६ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे साठे जप्त केले. संबंधित कारवाई अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील सर्व सहायक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, राज्य पुणे तसेच आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सणासुदीच्या काळात विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळीचा संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे, पुणे यांनी केले आहे.
