महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले असून, त्याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी सर्वांनी दक्ष राहून चोखपणे कर्तव्य बजावावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम, निवडणूक विषयक सर्व समन्वय अधिकारी, संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले की, प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण सत्र आयोजित करावे. त्यामध्ये प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करून प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा अभ्यास करावा.
भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) यांसारख्या पथकातील सदस्यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिल्या.
यावेळी श्रीमती कळसकर यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी करावयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. बैठकीत निवडणूक प्रक्रिया, मतदान प्रक्रिया, मतदान केंद्रे, कायदा व सुव्यवस्था, निवडणूकविषयक खर्च व्यवस्थापन, आदर्श आचारसंहिता, मनुष्यबळ, साधनसामग्री, ईव्हीएम स्ट्रॉंग रूम, वेबकास्टिंग, संपर्क आराखडा, मतदार जनजागृती, माध्यम कक्ष, विविध कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
