आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सचिन खिलारे यांचा अर्हम फाऊंडेशनच्या वतीने विशेष सत्कार

Spread the love

पुणे : पॅरिस येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक २०२४ मध्ये गोळाफेक या क्रीडा प्रकारात एफ ४६ या दिव्यांग श्रेणीत रजत पदक मिळवलेल्या सचिन खिलारे यांचा अर्हम फाऊंडेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

अर्हम फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिव्यांग राष्ट्रीय पुरस्कार २०२४ सोहळा गुरुवारी (दि. १९ सप्टेंबर) एस्.एम्. जोशी सभागृह, पुणे येथे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष, आमदार ओमप्रकाश (बच्चू) कडू लाभले होते.

तसेच सरहद फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय नहार, ‘आज का आनंद’ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक आनंद अग्रवाल, आणि श्री महावीर महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज शहा हे व्यासपीठावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते पॅरिस येथे झालेल्या पॅराऑलिम्पिक २०२४ मध्ये गोळाफेक या क्रीडा प्रकारात रजत पदक मिळवलेल्या सचिन खिलारे यांचा सत्कार करण्यात आला तसेच, पारितोषिक विजेते विनम्र खटावकर (बौद्धिक अक्षमता), विष्णू चिद्रेवार (बहुविकलांग), रोहन सोनवणे (बहुविकलांग), रोहित भारगुणे (अंध), प्रियंका दाभाडे (कर्णबधिर), हरिदास शिंदे (शारीरिक दिव्यांग) या विविध प्रकारातील खेळाडूंना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना श्रीफळ, स्मृतिचिन्ह, भेटवस्तू, आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

डॉ. शैलेश पगारिया यांनी सर्वांचे स्वागत केले आणि आपल्या भाषणात संस्थेबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमदार ओमप्रकाश कडू यांनी अर्हम फाऊंडेशनला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, सध्या जातिव्यवस्थेला धरून जे राजकारण सुरू आहे, ते न करता समाजातील दिव्यांग सारख्या दुर्लक्षित घटकांकडे लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे.

भविष्यात संस्थेला कोणतीही गरज लागल्यास, मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. सरहद फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय नहार यांनी सांगितले की, आपण सर्वांनी मानवतेसाठी काम केले पाहिजे.

त्यांनी अर्हम फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले आणि भविष्यात अर्हम फाऊंडेशनसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच संस्थेला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘आज का आनंद’ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक आनंद अग्रवाल यांनी दिव्यांगांसाठी कार्य करणे किती महत्त्वाचे आहे आणि समाजासाठी किती गरजेचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले आणि संस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या श्री महावीर महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज शहा यांनी मानवता आणि समाजातील सर्व दुर्लक्षित घटकांसाठी कार्य कसे करावे, याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी अर्हम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, संचालक डॉ. अतिश चोरडिया, खजिनदार श्रीकांत पगारिया, आणि विश्वस्त स्वराज पगारिया यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या विविध शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले, तर आभारप्रदर्शन स्वराज पगारिया यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. श्रद्धा कुलकर्णी आणि प्रज्ञा देशपांडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.